खिचडी
मराठी लोकांच्या खाण्याच्या पदार्थांमधून सर्वात स्पेशल कुठल्या २ डीशेश आहेत अस जर विचारलं तर पहिल उत्तर एकमतानी पुरण पोळी हे येईल .मराठी संस्कृतीमधे पुरण पोळीच मानाच स्थान आहे ......नव्हे तो आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. ..पुरणपोळीवर जरी एकमत झाल तरी ... दुसऱ्या डीश साठी मात्र कधीही एकमत होणार नाही......कोल्हापुरचे लोक पांढरा मटनाचा रस्सा किंवा मिसळ म्हणतील .नागपूरचे लोक "पुडाची वडी"किंवा " वडा भात " यांचा विचार करतील ..सतत कसल्यातरी घाईत असलेल्या मुंबईच्या लोकांच कदाचित पापलेट अथवा वडा पाव यावर एकमत होईलही पण वादविवाद वा to be precise वादाडपणा करण्याची हौस असणारे तत्वनिष्ट पुण्याचे लोक " उकडीचे मोदक"किंवा " चितळेची बाकर वडी"यावर प्रथम खुप वाद घालतील.... नंतर या विषयावर परिसंवाद देखील घेतले जातील . ज्यात काही पुण्याचे लोक ' चकली ' किंवा श्रीखंड यांची शिफारस करतील .........मग श्रीखंड हा पदार्थ मुळात मराठी नसून तो गुजराथी पदार्थ आहे आणि अठराव्या शतकाच्या तिसऱ्या दशकात गुजराथ मधून श्रीखंड पहिल्या बाजीरावाने महाराष्ट्रात आणले..याचे दाखले देखील दिले जातील. ." पहिल्या " कि " दुसऱ्या" बाजीरावाने यावर वेगळा वाद सुरु व्हायची शक्यता पण नाकारता येत नाही...असो.
तात्पर्य काय कि पुरणपोळी नंतर कोणचा दुसरा पदार्थ हे सांगण कठीण आहे.माझ्या मते मात्र पुरणपोळी नंतर मराठी लोकांची स्पेशालिटी आहे ती म्हणजे " खिचडी ".....खिचडी ?...पुरणपोळी आणि खिचडी ...."काही तरीच काय ?..." अरे कंहा राजा भोज और कंहा गंगू तेली " असाच हा प्रकार वाटेल पण..." जम्मू ते कोइम्ब्तूर " आणि कलकत्ता ते राजकोट "ह्या उभ्या आडव्या भागात येणाऱ्या अनेक राज्यातल्या अनेक ठिकाणी खिचडी खाल्यानंतर ." मराठी लोकांसारखी खिचडी कुठल्याही प्रदेशातल्या लोकांना करता येत नाही "या निष्कर्षावर मी पोहचलो आहे ...खिचडी .. मग ती साबुदाण्याची असो , मुगाची असो किंवा तुरीची असो .आपली ती खास डेलिकसी आहे हे मी स्वानुभवाने आणि आग्रहाने सांगू इच्छितो. उत्तर भारतामध्ये खिचडी आजारी असल्यावरच खातात असा गैरसमज आहे.खर तर ह्या लोकांनी केलेली खिचडी त्याच लायकीची असते. बिरबलची खिचडीची गोष्ट तुम्हाला माहित असेलच...खिचडी कशी करतात हे बहुदा ' बिरबल'ला सुद्धा माहित नसावं म्हणूनच त्यान ती खिचडी शिजवली नसावी....... यदाकदाचित बिरबलनी केलेली खिचडी शिजली असती आणि बादशहानी ती खाल्ली असती तर दुसऱ्याच क्षणी त्याच्यावर रागावून बादशहानी त्याची उत्तर भारता मधून महाराष्ट्रात खिचडी कशी करतात हे शिकण्यासाठी "हकालपट्टी केली असती याबद्दल माझ्या मनात तीळमात्र शंका नाही....एकदा दिल्लीच्या ५ स्टार हॉटेल ताज मध्ये माझ्या मेव्हण्याबरोबर रात्री जेवायचा योग आला तिथला वेटर आम्हाला स्पेशल डीश मध्ये खिचडी आहे असं म्हणाला ...महाराष्ट्राच्या इतक्या दूर अभिमानान स्पेशल डीश खिचडी अस सांगणऱ्या त्या वेटरच मला कौतुक वाटलआणि खिचडी ऑर्डर करण्यात आली...खरचअजूनही त्या खिचडीची चव जिभेवर रेंगाळत आहे..मी वेटरला कुक बद्दल विचारलं तर तो महाराष्ट्रीयन कुक नव्हताअस लक्षात आल .आणि आश्चर्य...वाटल...कस शक्य आहे ?..पण मग रेसिपी बद्दल चौकशी केल्यावर कळल की कुकनी 'तरला दलाल 'ची नव्हे ...तर "कमलाबाई ओगलेंची" रेसिपी रेफर केली होती...आणि तेंव्हापासून महाराष्ट्रीयन खिचडी बद्दल माझ मत ठाम झाल.
लहानपणी आमची आजी आम्हाला एका लबाड सुनेची " खिचडीची गोष्ट " सांगायची ..... सासूला कीर्तन ऐकायला देवळात पिटाळून खिचडीचा मस्त बेत करणारी ती सून खरच हुषार असावी..
. खीचडम खिचडी...ताटभर खिचडी
.. पापड तोडी तुपाची कडी ..सांडगे मोडी ...
लोणच्याच्या फोडी .. दह्याची वडी
आणि काय सांगू तुला सुने …….कीर्तनाची गोडी .
अस सांगून गोष्टीतली ती सासू सुनेला खूप बदडून काढायची असा त्या गोष्टीचा शेवट होता.....गोष्टीतील सासू सुनेचा भाग जाऊ द्या ....आणि खर सांगा ...अशी खिचडी खायला कुणाला आवडणार नाही ? ......बर '" संस्कृतीच " म्हणाल तर खिचडी देखील आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे कारण....संक्रातीच्या आदल्या दिवशी " भोगीला " लग्न झालेल्या मुली जेंव्हा माहेरी येतात तेंव्हा आग्रहाने आवर्जून खिचडीचा बेत केला जातो . मग खिचडी खाता खाता आई आपल्या सुनेच्या आणि मुलगी आपल्या सासूच्या चुगल्या करून मनातली सर्व मळमळ काढून टाकतात...आणि दुसऱ्या दिवशी तिळगुळ खाऊन पुन्हा आपापल्या घरी गोड बोलू लागतात... ..असा ह्या खिचडीचा महिमा आहे....
भोगी हा सण भारतातल्या इतर राज्यात सुद्धा वेगवेगळ्या नावांनी होतो पण नीट करता येत नसल्यामुळे ते लोक खिचडीचा बेत करत नाही .
खिचडी बहुतेक सर्व गरीब स्वभावाच्या माणसांना आवडते ...आणि ज्यांना आवडत नाही त्यांची तस सांगायची हिम्मत होत नाही ,.तुम्हाला जर खिचडी आवडत नसेल तर ती कशी खातात याच टेक्निक तुम्हाला बहुदा माहित नसाव....खाली दिलेल्या टिप्स " ज्यांना खिचडी आवडत नाही पण खावी लागते " अशा बंऱ्याच जणांना उपयोगी ठरतील
खिचडी जर फडफाडीत झाली तर ती साय घालून दह्याबरोबर खावी ...जर जास्त शिजून मऊ झाली तर ती साजूक तुपाबरोबर खावी...तिखट झाली तर लिज्जत पापड कुस्करून दुधाबरोबर खावी ....मीठ कमी झाल असेल तर अमूल बटर बरोबर खावी. ..तिखट आणि मीठ दोन्ही कमी असेल तर लिंबाच्या लोणच्या बरोबर खावी किंवा नुसतीच गिळावी.......कमी शिजली असेल तर मायक्रोवेव मध्ये २ मिनिटात शिजवून खावी ...किंवा काही न बोलता मुकाट पणे खावी ...जळली असेल तर वरवरची... खावी आणि उरलेली दुसरया दिवशी खरवडून ब्रेकफास्ट मध्ये खावी ....... तर सांगायचं तात्पर्य हे कि खिचडी जर योग्य पद्धतीने खाल्ली तर ती न आवडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
एक भेळ सोडली तर खिचडी इतका फ्लेक्जीबल पदार्थ माझ्या तरी माहितीत नाही.
खिचडी कशी खावी ह्या बरोबरच ती केंव्हा केंव्हा खावी हे देखील समजून घेण अतिशय महत्वाच आहे .दुपारी जर मस्त जेवण झाल असेल तर रात्री निमुटपणे खिचडीच खावी...उन्हाळ्यात जेंव्हा लाईट गेली असते तेंव्हा....किंवा कणिक संपलेली असते तेंव्हा.....किंवा बाजारात जेंव्हा भोपळे ,गिलकी,पडवळ असल्याच भाज्या असतात व थालीपीठाची भाजणी पण संपलेली असते तेंव्हा न चिडता शांतपणे खिचडी खावी....खुप शॉपिंग करून दमल्यावर ,हॉटेल मध्ये न जेवता बायकोला जर घरी आणल तर खिचडीच खावी.....किंवा बायकोची बोलणी खायची तयारी ठेवावी.......तसच सवय असावी म्हणून १५ दिवसात एकदा तरी खिचडी जरूर खावी . असो..... ..जाणत्यांना अधिक उपदेश करण्याचा माझा हेतू नय्ये.
तुरीच्या किंवा मुगाच्या खिचडी सारखीच साबुदाण्याची खिचडी ही पणफक्त महाराष्ट्रीयन लोकांनाच करता येते याबद्दल सर्व महाराष्ट्रात एकमत व्हायला हरकत नसावी .जर संजीव कपूर नी करून दाखवलेली साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी तुम्ही कुणी बघितली असेल तर तुमच्या लक्षात येइल् कि इतर प्रान्तातल्या लोकांना साबुदाण्याची खिचडी चांगली का करता येत नाही. ....उपासाला चालणारी ही खिचडी आवडत नाही अस म्हणणारा एकही महाराष्ट्रीयन माझ्या पाहण्यात नाही .आमच्या घरी या खिचडीला आम्ही गोरी किंवा गोल खिचडी म्हणतो........गोरी ह्याच्यसाठी कि ती मूगाच्या खिचडी सारखी ती काळी नाही म्हणून ..आणि … गोल खिचडी " हे माझ्या मुलानी साबुदाण्याच्या आकारावरून दिलेलं एक गोड नाव आहे..
लहानपणी मला वाटायचं कि मोठे लोक " साबुदाण्याची खिचडी खायला " मिळते म्हणूनच उपास करतात .असा हा माझा प्रामाणिक समज मी स्व:ता मोठा होईपर्यंत होता.. ...अजूनही लागोपाठ २ उपास आल्यावर " तुझी तर मजा आहे " अस मी बायकोला ऐकवतो ...ही खिचडी करणं म्हणजे एक कला आहे आणि एक प्रोसेस पण आहे ...मूगाच्या खिचडी सारखी केंव्हाही आणि कुणालाही ती करता येत नाही. ...संजीव कपूर पण करू शकत नाही त्यामुळे हौशी लोकांनी प्रयोग करू नये.
आधी पांढरे स्वच्छ साबुदाणे निवडून साफ करायचे ......ते अगोदर बरोब्बर भिजवायचे ....अतिशय काळजीपूर्वक दाणे भाजायचे .....मग त्याच कूट मिक्सर मध्ये पर्टिक्युलर स्पीडवरच करायचं .......केलेलं कूट किंवा भाजलेले दाणे कुणाला खायला न देणे हा पण या प्रोसेस चा महत्वाचा भाग आहे .....जाऊ द्या ....मी एकदा साबुदाण्याची खिचडी करायला सुरवात केली होती पण साबुदाण्याची खिचडी तर दूरच मला साबुदाणा पण नीट भिजवता आला नाही ..." तेथे पाहिजे जातीचे ".
.....साबुदाण्याची सर्वोत्तम खिचडी माझ्या सासरी मी अनेक वेळा खाल्ली आहे ...आणि अनेक प्रयत्नानंतर अलीकडे घरी पण तशी खिचडी मिळू लागली आहे .... ....... पांढरी स्वच्छ खिचडी आणि तिच्या बरोबर जवळ जवळ तेवढच पांढर असलेल दही ...अशी जर डीश .हातात आली तर " स्वर्ग जवळ पासच असावा " अस मनात येत....आमच्या घरी उपास असो अथवा नसो ही खिचडी अनेकदा केली जाते .
काळी असो ….किंवा गोरी असो खिचडी ही जय आवडीन आणि आनंदान खाल्ली तर खिचडी करणारीला पण आनंद होतो ही साधी गोष्ट समजे पर्यंत आपल अर्ध आयुष्य निघून गेलेलं असत ......लाइफ इज लाईक द्याट,,,,,,....तेंव्हा माझ्या शब्दांच्या खिचडीकडे आता दुर्लक्ष करा आणि तयर व्हा गरमा-गरम वाफाळलेली खिचडी खायला !
-----राजेन्द्र फणसळकर.
१५ जून १९९३